नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार, वाशी येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न

नवी मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी एकत्र येऊन माहाविकास आघाडी स्थापन करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. आता तीच रणनीती आखून येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लाढविण्याच्या तयारीत आहे. यामुळे भाजपा समोर मोठे आव्हान असणार आहे तसेच ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपा मध्ये प्रवेश केलेले गणेश नाईक यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई असणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार आहेत. याच निवडणुकीची तयारी म्हणून वाशी येथे महाआघडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे.

आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही,’ असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले आहेत. महाआघाडीच्या नवी मुंबईतील मेळाव्यात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण हे उपस्थित होते.

एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी झाल्यास भाजपाची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.