
मुंबई: हिंगणघाट येथील घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
विदर्भातील हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेतील पीडितेवर योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी तिच्या उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून करण्यात येईल, असे स्पष्ट मंगळवारी केले.
भरचौकात ३० वर्षीय शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हिंगणघाटच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. तर मंगळवारी वर्धा आणि हिंगणघाट येथे नागरिकांनी मोर्चा काढत आरोपीविरोधात हैदराबादच्या धर्तीवर आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी पीडितेच्या आईने आरोपीला आपल्या ताब्यात द्या, त्यालाही तसेच जिवंत जाळा, ज्या यातना माझी मुलगी भोगत आहे, त्याच यातना त्यालाही झाल्या पाहिजेत, असे म्हणत टाहो फोडला आहे.






