मोठी धावसंख्या उभारूनही पहिल्या एकदवसीय सामन्यात भारत न्यूझीलंड कडून पराभूत

T 20 मालिकेत सपाटून मार खाणाऱ्या न्यूझीलंड संघाने वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात जोरदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंड संघाने आज भारताचा पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

टॉस जिंकून न्यूझीलंडने भारताला पहिलं फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने पृथ्वी शॉ आणि मायांक अग्रवाल या जोडीने डावाची सुरुवात केली. टीम इंडियाने 347 धावांचा डोंगर उभारला होता. श्रेयस अय्यरने कारकीर्दीतील पहिलीवहिली शतकी खेळी साकारली. त्याने 11 चौकार आणि एका षटकारासह 103 धावांची खेळी केली. लोकेश राहुलने 88 तर विराट कोहलीने 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी रॉस टेलरच्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने भारताविरुद्धची पहिली वनडे जिंकली. रॉसने या लढतीत 84 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावांची तडाखेबंद खेळी केली. रॉसला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. रॉसला टॉम लॅथमची साथ मिळाली. टॉमने 8 चौकार आणि 2 षटकारांसह 78 धावांची खेळी साकारली. हेन्री निकोल्सने 11 चौकारांसह 78 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या तिघांच्या दमदार खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने 6 विकेट्स आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला.

या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.