सफर शिकागोची: अवती ,भवती सभोवती….मज दिसे चित्र समृद्धीचे – डॉ भास्कर धाटावकर – भाग 17

अवती ,भवती सभोवती….मज दिसे चित्र समृद्धीचे

माझी कॅनडातील मिसीसागा आणि अमेरिकेतील शिकागोची गेली पंचेचाळीस दिवसांची घाईघाईत ठरविण्यात आलेली ट्रीप आता संपत आली आहे.वेध लागलेत गणपतीच्या आगमनाचे. त्यासाठी परतीचा मुंबईत जाण्याचा दिवस लवकर येत आहे.

प्रथम मिसीसागातील वास्तव्यात कॅनडाचा इतिहास, संस्कृती,प्रादेशिक रचना,प्रेक्षणीय स्थळे,जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारा नायगारा फाॅल्स, येथले राहाणीमान, आर्थिक घडामोडींवर भरपूर लिहून झाले ते माझ्या जिवाभावांच्या मित्रमंडळीं बरोबर शेअर करून माझ्या आनंदात त्यानांही सहभागी करून घेतले.

मिसीसागाहून बायरोड आम्ही शिकागोत प्रवास करीत मध्येच प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत घेतलेल्या आनंदाचा अनुभव विलक्षण होता आणि येथे जे जे पाहिले ,अनुभवले ,समजून उमजून घेऊनच शिकागो या शहरात आल्यावर पुन्हा येथ वैशिष्टय़ पूर्णता विशद करणारी लेखमाला सुरू केली .त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळत गेला,माझा उत्साह, हुरूप वाढला आणि त्यामुळेच मी लिहीत राहिलो.

अमेरिकेतील आणि कॅनडातील समृद्ध जीवन पाहिल्यानंतर अंतर्मुख व्हावे लागते.अमेरिका! युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 50 राज्यांचा मिळून फेडरेशन साच्यातील लोकशाही प्रधान जागतिक महासत्ता असलेला देश. ज्याचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष आहेत,त्यांची निवड पन्नास राज्यांतील जनतेतून दर चार वर्षांनी होत असते.

नावीन्याचा अखंड ध्यास हाच येथला स्थायीभाव आहे.अमेरिकेचा इतिहास केवळ एका वाक्यात सांगायचा झाला तर *स्वप्ने पाहाणे आणि ती सत्यात उतरविण्यात आपली सारी शक्ती एकवटून प्रयत्न करणे या प्रक्रियेची गोळाबेरीज म्हणजे अमेरिकेचा इतिहास म्हणता येईल*.

Alaska State, USA

अमेरिकने कोणती दूरदृष्टीत ठेवून 1867 साली सतत बर्फाच्छादित असलेला अलास्का रशियाकडून विकत घेतला समजून येत नाही पण आज तो महत्वाचा घटक ठरला आहे.

अमेरिकेतील सुख समृद्धी,उज्ज्वल भवितव्याची ग्वाही,संशोधनासाठी सर्वतोपरी उत्कृष्ट संधी यामुळेच तरूणाई आकर्षित होऊन स्वतःलाच सिद्ध करण्यास येत असते व यामध्ये मराठी टक्केवारी लक्षणीय असते. अशी मराठमोळी जनता येथे आल्यावर आपली मातृभाषा ,सणवार, आपले सांस्कृतिक बंध जपण्याचा प्रयत्न करीत असतात.

Celebrating Indian Festival in USA

यामध्ये अमेरिकेत स्थायिक झालेले व मायबोलीवर नितांत प्रेम करणार्‍यां मराठी मंडळीने मराठी साहित्या मध्ये मोलाची भर घालून साता समुद्रापारही मराठीचा झेंडा फडकवत ठेवला आहे.या साहित्यिकांचे अनुभव एकता त्रैमासिक छापण्यात येऊ लागले.तसेच बृहन्महाराष्ट्र वृत्त मासिक अंक सुरू झाला नि यांच्या माध्यमातून साहित्यिकांत सुसंवाद घडू लागला.यातून दर्जेदार शंभरहून अधिक पुस्तके गेल्या पंचवीस तीस वर्षांत प्रसिद्ध झाली.त्यात सकस कथा संग्रह, काव्य संग्रह प्रकाशित झाले.मराठी जनांवर आतापर्यंत अमेरिकेन संस्कृतीचा कसा प्रभाव पडत गेला आणि, तो कोणत्या सीमारेषेवर पोचला आहे त्याचाही सविस्तर धांडोळा घेण्यात आला आहे.महाराष्ट्र मराठी मंडळानी अर्धशतक पूर्ण करून शतकाकडे आश्वासक वाटचाल सुरू केली आहे.शिकागोत तर अधिकृत मराठी शाळाच सुरू झाली आहे. हा अनिवासी मराठी बंधू,भगिनींचा निश्चितच उल्लेखनीय योगदान आहे.त्यांच्या आशा आकांशा, स्पर्धेत टिकून राहाण्यासाठीची चाललेली धडपड, त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि शोधलेल्या उत्तरातून आयुष्यात उठलेले काहूर! या सर्वांच्या छटा मराठी वाड्:मनाच्या मुख्यधारेत समाविष्ट झाली आहे.

येथे वैभव आहे,समृद्धी आहे,उज्ज्वल भवितव्याची संधी आहे हे जरी खरे असले तरी त्यासाठी आणि राहाणीमान व जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी कष्ट, मेहनत करण्याची सततची मानसिकता व सवय ठेवावीच लागते आणि हाच नियम कॅनडातही टिकून राहाण्यासाठी लागू होतो.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.