राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा, श्रीरामजन्मूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला वेग येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा करण्यात येत असल्याचं लोकसभेत जाहीर केल्यानंतर या ट्रस्टबाबतची गॅजेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच ट्रस्टच्या विश्वस्तपदी विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली असून इतर सदस्यांच्या नावाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात ट्रस्टच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लोकसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही ट्रस्ट स्वायत्त असणार असून मंदिर बांधकामाशी संबंधित सर्व निर्णय ट्रस्टच घेणार आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी लोकसभेत सांगितलं. अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीकाम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आण भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने ट्रस्टला आर-२०, ग्रेटर कैलाश पार्ट-१, नवी दिल्ली येथे कार्यालय देण्यात आले असून तशी नोंदणीही करण्यात आली आहे. त्यानंतर ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी स्विकारल्याने त्यांना धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्त केलं आहे. या ट्रस्टमध्ये एका दलित व्यक्तीसह एकूण १५ सदस्य असणार आहेत.

दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगाडिया यांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तोगडियांनी केली. राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या या घोषणेनंतर त्यांचे अभिनंदन केले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.