
नवी दिल्ली: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आज सर्वांना उत्सुकता होती. एक्झिट पोलमध्ये वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आपनेच बाजी मारली. अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्या वेळी दिल्लीत बहुमताने निवडून आले आहेत. केजरीवालांच्या आपने भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा सूफडा साफ केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (११ फेब्रुवारी) जाहीर झाले. भाजपा आणि आप अशी थेट लढत निकालात बघायला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करत भाजपानं ‘आप’ला आव्हान दिलं. मात्र, ‘आप’नं विकासाचा मुद्दा दिल्लीकरांच्या समोर मांडत भूमिका कायम ठेवली. त्याचे परिणाम निकालात दिसून आले. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य “आप’च्या झोळीत घसघशीत मतं टाकली. त्यामुळे ‘आप’नं भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवत मोठा विजय संपादन केला. ७० जागांपैकी ६३ जागा आपनं जिंकल्या, तर भाजपानं सात जागांवर विजय संपादन केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ते उत्साहात आहेत. सगळीकडं गुलालाची उधळण करत कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहे. योगायोग म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. ‘आप’ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आतापर्यंतचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. हा सत्याचा विजय झाला आहे. मूळ प्रश्नांवर राजकारण करायला हवं. राजकीय पक्षांनी यातून शिकलं पाहिजे,” असं सुनिता केजरीवाल म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली विधानसभा बरखास्त केली. आता निकालानंतर नवीन विधानसभा गठित केली जाईल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पटपडगंज मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे मधल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडले होते. तब्बल दोन हजार मतांनी मागे असलेल्या सिसोदिया यांनी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये पुन्हा आघाडी घेत विजय संपादन केला.
एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागां वाढल्या आहेत. मात्र, भाजपाकडून करण्यात आलेला दावा फोल ठरला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तीन जागा जिंकलेली भाजपा सध्या १३ जागांवर आघाडीवर आहे. तर आपच्या झंझावातात काँग्रेसचा दिल्लीतून पुन्हा एकदा सफाया झाला आहे. सध्या आप ५७ जागांवर आघाडीवर आहे.
निकालानंतर जनतेनं दिलेला जनादेश मान्य असल्याचं सांगत काँग्रेसनं पराभव स्वीकारला आहे. “या पराभवानं काँग्रेस हाताश झालेली नाही. यापुढील काळातही काँग्रेस दिल्लीच्या विकास लक्ष ठेवेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले. तरीही अपयश आलं. मात्र, प्रत्येक निवडणूक शिकवत असते. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये या पराभवामुळे नाराजी नाही. विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन,” असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
सीएए आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चेत राहिले. शाहीन बाग आंदोलनावरून भाजपानं आप व काँग्रेसवर निशाणा साधला होता. शाहीन बाग ओखला विधानसभा मतदारसंघात येतं. या ठिकाणी “आप’चे उमेदवार अमानतुल्लाह खान हे आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार ब्रह्म सिंह यांच्याविरोधात त्यांनी ६५ हजार ५४६ मतांनी आघाडी घेतली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पुन्हा सत्तेत येत आहे. या निकालामुळे मुंबईतील ‘आप’ कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. कार्यकर्त्यांनी गाण्यावर ठेका धरत जल्लोष केला.
आप’ पुन्हा एकदा सत्तेत येत आहे. दिल्लीकरांनी सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं आहे. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिसोदिया म्हणाले,’आमचा विजय हे सिद्ध करेल की, खऱ्या देशभक्तांना राजकारणात येण्याची संधी मिळाली तर ते लोकांसाठी काम करतात. आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे,’ असं सिसोदिया यांनी सांगितलं.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्व कौल हाती आले असून, दिल्लीकरांनी पुन्हा ‘आप’ला सत्तेत बसवलं आहे. प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपाला अपयश आलं आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभव येणार असल्याचं दिसत आहे. कौल हाती आल्यानंतर ‘आप’चं कार्यालय सज्ज झालं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच दिल्लीतल्या सत्तेविषयी व्यक्त करण्यात येत असलेले अंदाज सुरूवातीच्या कलातून दिसून येत आहे. आम आदमी पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ‘आप’नं ६२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ८ जागांवर पुढे आहे. काँग्रेसकडं मात्र, दिल्लीकरांना सपशेल पाठ फिरवली आहे. काँग्रेस अजूनही शून्यावरच आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीचे पहिले कल हाती आले असून, एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे ‘आप’नं मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 32 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर असून भाजपानं दहा जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसनं अजून भोपळाही फोडलेला नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि आप हेच दोन प्रमुख पक्षांनी प्रचाराच मैदान गाजवलं. पंधरा वर्ष दिल्लीच्या सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची मरगळ मात्र, कायम दिसली. पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अखेरच्या टप्प्यात काही सभा घेतल्या. निवडणुकीत काँग्रेस फार प्रभावी ठरले नाही.
मतमोजणीला सुरूवात होण्यापूर्वी भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. “मी निराश नाही. भाजपासाठी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे, याबद्दल मला विश्वास आहे. भाजपानं ५५ जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही,” असं तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला तासाभरात सुरूवात होणार आहे. मात्र, मतमोजणीला सुरूवात होण्याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच केजरीवाल यांच्या निवासस्थानी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी फटाके फोडू नये असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाकडून प्रचंड प्रतिष्ठेची करण्यात आली. ‘आप’च्या विकासाच्या मुद्याला उत्तर देण्यासाठी भाजपानं राष्ट्रवादाचं अस्त्र उगारलं. मात्र, ते अपयशी ठरणार असल्याचे अंदाज मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वी ‘आप’च्या कार्यकर्त्यांकडून मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमवर लक्ष ठेवण्यात आलं. सोमवारी रात्री ‘आप’चे उमेदवार अमानतुल्ला खान यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराणी बागेतील मिराबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या स्ट्राँगरूम बाहेर रात्रभर कडा पहारा दिला होता.






