करोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस बनविण्यात यश

पुणे: चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसनं आतापर्यंत हजारो बळी गेले आहेत. या व्हायरसच्या विळख्यात जगातील अनेक देश सापडले आहेत. हा व्हायरस रोखण्यात अपयश आलं असताना, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं करोना व्हायरसला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात यश मिळवलं आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध असून, सहा महिन्यांनतर एखाद्या व्यक्तीवर या लसीची चाचणी केली जाईल.

ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. ही लस सहा महिन्यांत मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगानं या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झालं आहे, असं एसआयआयचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.

मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर करोना व्हायरसला रोखण्यासाठी तिचा वापर करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. २०२२ च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे.