डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

डोंबिवली: डोंबिवली MIDC मधील मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली भीषण आग संध्याकाळी उशीरापर्यंत धुमसत होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीला आता NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. एमआयडीसी फेज 2 इथे लागलेली ही आग शेजारच्या कंपन्यांमध्येही पसरली. दुपारी 2 च्या सुमारास लागलेल्या या आगीवर सातच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यास जवानांना यश आलं. तरीही अजूनही आग पूर्णपणे विझलेली नाही. या परिसरात रात्री उशीरापर्यंत ज्वाळा दिसत होत्या आणि धुराचे प्रचंड लोट दूरपर्यंत पसरलेले होते. या आगीत जीवितहानी झालेली नाही.

डोंबिवलीमधील एका मेट्रोपॉलिटन केमिकल कंपनीत आग भडकली आहे. यात केमिकल ड्रमचे एकापाठोपाठ स्फोट होत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या परिसरात इतर कंपन्याही आहेत. तिथल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.

एमआयडीसीमधील फेज 2 मध्ये ही आग लागली आहे.  आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या वेळी केमिकल ड्रमसचे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. या रासायनिक पदार्थांमुळेच  आग आणखी पसरत आहे. आधी मेट्रो कंपनीला लागलेली आग शेजारच्या W18 कंपनीलाही लागली असल्याची माहिती मिळते आहे. आता डोंबिवली MIDC कडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

कल्याण- शीळ फाटा रस्त्याचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. या आगीचा डोंबिवलीतून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शीळ फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

या दाट काळ्या धुरामुळे गुदमरायला होऊ शकतं. दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतरावर आश्रय घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे. परिसरातल्या इतर कंपन्या आणि शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.