गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाची सोडत जाहीर

मुंबई:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गिरणी कामगारांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. गिरणी कामगारांसाठी 3 हजार 894 घरांची सोडत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाली. सोडतीमध्ये मिळालेलं एकही घर विकू नका, घर विकून मुंबईच्या बाहेर जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना केलं आहे. त्याचबरोबर तुमच्या हक्काच्या घरात मला चहाला बोलवा असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री अस्लम शेख उपस्थित होते.

‘मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे, अशी भावनिक सुरुवात करुन मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे. घर लागल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा. आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका’, असेही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान राज्य सरकारने बंद पडलेल्या गिरण्यांमधील कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना हाती घेतली आहे. सुमारे पावणे दोन लाख कामगार, वारसदारांना ही घरे पुरविण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे. गिरणी कामगारांच्या घरांची सोडत आज काढण्यात आली. बॉम्बे डाइंग, श्रीनिवास मिलच्या जागेवर बांधण्यात आलेल्या 3,894 घरांची संगणकीय सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सोडत काढण्यात जाहीर झाली.