दाम्पत्याला विवस्त्र करून अत्याचार आणि मारहाण, एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करणार – गृहमंत्री

अहमदनगर : अहमदनगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. तक्रारदार महिलेनं मारहाण करणाऱ्यांवर २०१६ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 

तो गुन्हा मागे घ्यावा यासाठी महिलेचे वडील, भाऊ, दीर आणि इतर नातेवाईकांनीच त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय. आरोपींनी दाम्पत्यावर पेट्रोल टाकत पट्ट्यानं बेदम मारहाण केली. 

महिला आणि तिच्या पतीनं मारहाण करताना आवाज करू नये यासाठी कापडानं त्यांचे तोंडही बांधण्यात आलं होतं. एवढा अमानुष छळ करत असताना आरोपींनी या घृणास्पद घटनेचा मोबाईलनं व्हिडिओही काढला.  

नगरच्या घटनेत कुटुंबातीलच सात जण आरोपी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय. या घटनेची आयपीएस अधिकऱ्याकडून महिनाभराच्या आत चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानसभेत केली.