
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक आघाडी प्रमाणे विद्यार्थी आघाडीला सुद्धा महत्त्व प्राप्त झाल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिकाधिक युवकांना संधी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत सूतोवाच केले होते. त्यानंतर अनेक तरुण उमेदवारांना प्राधान्य देत आमदार व मंत्री बनविले. याचा परिणाम राष्ट्रवादी युवक संघटना आणि विद्यार्थी आघाडीवर झालेला पाहायला मिळत आहे. नुकत्याच रिक्त झालेल्या विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, औरंगाबादचे ऋषिकेश देशमुख, आणि पुण्याचे सनी मानकर यांची नावे देखील राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. याव्यतिरिक्त नांदेड, बीड, हिंगोलीमधूनही इच्छुक युवकांची नावे पुढे येत आहेत.







