
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर.
मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १६ जण ठार झाले असून १३ जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
रविवारी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नव्या दमाने ‘कोसळलेल्या’ पावसाने सोमवारी मुंबई, ठाणे परिसरात दाणादाण उडवली. पहाटेपासूनच तुफान बरसणाऱ्या पावसाने मध्य रेल्वेला जेरीस आणतानाच रस्ता वाहतुकीच्याही नाकीनऊ आणले. पाऊस आणि भरती हे समीकरण जुळल्याने नेहमीप्रमाणे सखल भागांत पाणी साचून मुंबईकरांचा दिनक्रम विस्कळीत झालाच, त्याशिवाय, शीव-माटुंगा स्थानकांदरम्यान रुळांवर साचलेले पाणी, लोणावळा घाटात मालगाडीचे डबे घसरणे, कर्जत-खोपोली दरम्यान रुळांवर झाड पडणे यांमुळे मुंबई-पुणे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस वाहतूकही बंद पडली होती. एकूणच आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाने केलेल्या तुफानी ‘बॅटिंग’पुढे सर्व यंत्रणांनी शरणागती पत्करल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. आज, मंगळवारीही मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरींचा अंदाज असून, ठाणे आणि पालघरला तर ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पावसाचा एकूणच जोर लक्षात घेता पुढील सात दिवसांत समुद्रात ४.७९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने पालिकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. नौदलाची नऊ व अग्निशमन दलाची सहा बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
सोमवारी पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला. मुसळधार पावसामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून मध्य रेल्वेने कुर्ला ते ठाणे दरम्यानची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल सुरुच आहेत.






