Yes Bank संस्थापक राणा कपूर ईडीच्या ताब्यात

मुंबई : येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. मुंबईतल्या वरळीमधल्या समुद्र महल या अलिशान इमारतीत राहणाऱ्या राणांच्या घरी ईडीनं जवळपास 12 तास चौकशी केली. यावेळी राणा यांच्या घरातून कागदपत्र आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले आहेत. तसंच ईडीनं मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत गुन्हाही दाखल केलाय. त्यानंतर राणा कपूर यांना ईडी कार्यालयात बोलवून त्यांची चौकशी सुरु आहे. DHFL, CCD आणि IL&FS या कंपन्यांना दिलेली कर्ज थकल्यानं राणा यांच्यावरचा संशय बळावला आहे. दरम्यान राणा कपूर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

चौकशीनंतर ईडीनं राणा कपूर यांनी ताब्यात घेत चौकशीसाठी नेलं आहे. डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप राणा कपूर यांच्यावर करण्यात आला आहे. मनी लॉर्डिंगच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचनालयाकडून (ED) सलग दुसऱ्या दिवशी कसून चौकशी सुरु आहे. ‘ईडी’ने कपूर यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप आणि मोठ्या प्रमाणात निधी हस्तांतर केल्याचा आरोप आहे. कपूर आणि त्यांच्या पत्नीला लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.