
पुणे– होळीच्या सणादिवशी पुरणपोळी आणि श्रीफळ नैवेद्य म्हणून होळीमध्ये टाकले जाते. ही धार्मिक परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण त्या होळीमध्ये पुरणपोळी व श्रीफळ न टाकता तीच पोळी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला दिली तर तो खरा आनंद समजता येईल. या उद्देशाने मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने होळीच्या दिवशी होळीमध्ये पुरणपोळी न टाकता ती भुकेल्यांच्या पोटात टाकण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे स्वयंसेवक शहरभर फिरून पुरणपोळ्या गोळा करणार असून त्या सर्व पोळ्या अंध, अपंग, अनाथाश्रमात नेऊन देणार आहेत.
अनेक नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दान, सामाजिक कार्य तसेच गरजू लोकांच्या उपयोगी येईल असे काम करण्याची इच्छा असते. मात्र, योग्य संधी न आल्याने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. परंपरेप्रमाणे होळी सणाच्या दिवशी होलिका दहन केल्यानंतर होळीला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. हा नैवेद्य होळीच्या बाजूला न ठेवता होळीमध्ये टाकला जातो. तसेच त्यासोबत श्रीफळ देखील अर्पण केले जाते. होळी सण साजरा करण्याच्या ठिकठिकाणी अनेक प्रथा आहेत. प्रत्येक घर, सोसायटीमध्ये होळी साजरी केली जाते. यात शेकडो, हजारो पोळ्या अग्निमध्ये टाकल्या जातात.
समाजात असे काही गरीब, निराधार, अंध, अपंग, फिरस्ती लोक आहेत, ज्यांना सणाच्या दिवशी पोळी खाता येत नाही. किंबहुना अनेकांना पोटभर जेवण देखील मिळत नाही. होळीमध्ये टाकली जाणारी पोळी जर अशा भुकेल्यांच्या पोटासाठी दिली तर ते खरे पुण्य समजता येईल. याच उद्देशाने नवी सांगवी येथील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
होळीमध्ये पोळी न टाकता ती संस्थेच्या स्वयंसेवकांकडे जमा करावी. त्यासोबत आपल्या इच्छेने आणखी पोळ्या देता आल्या तरी त्या द्याव्यात.होळीच्या दिवशी (सोमवार, दि. ९) शहरभर संस्थेचे स्वयंसेवक रात्री साडेसात वाजेपर्यंत फिरून या पोळ्या जमा करणार आहेत.
होळीच्या दिवशीच रात्री या सर्व पोळ्या अंध, अपंग, अनाथाश्रम, भुकेल्या लोकांना देण्यात येणार आहेत. नागरिकांनी पोळ्या देण्यासाठी ‘ऋतुराज सर्व्हे नं.७०/१, सोनाली किराणा दुकानाशेजारी, समतानगर, नवी सांगवी’ या पत्त्यावर तसेच आन्ना जोगदंड (9359201295 / 9881209119), विकास शहाणे (9284159625), अतिश गायकवाड (7083396089), अक्षय जगदाळे (8149549541), दिपक शहाणे (9921913050), संदिप दरेकर (9175777771) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.






