
शिर्डी – जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला असून, भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाबत भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे.
देशातील सर्वाधिक भाविक येत असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांची संख्या रोडावली असून, परीक्षांबरोबरच कोरोना हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या २० टक्क्यांनी घटली आहे.
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दररोज लाखोंच्या संख्येने देश-विदेशातील भाविक हजेरी लावत असतात. काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणी नागरिक जाण्यास धजावत नाहीत.
साईबाबा संस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या भाविकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डीला येऊ नये, असे आवाहन केल्यानंतर जगभरातील साईभक्तांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.






