
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज चौदावा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने नवी मुंबईच्या वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रम पार पडला. यात बहुप्रतीक्षित शॅड कॅबिनेट अर्थात प्रतिरुप मंत्रिमंडळाची आज घोषणा करण्यात आली. या आजच्या शॅडो कॅबिनेटमधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित ठाकरेंची खाती. मनसे नेते अमित ठाकरे यांना काका उद्धव ठाकरे आणि चुलत भाऊ आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याच्या कारभारावर नजर ठेवण्याची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय माहिती व तंत्रज्ञान, ग्रामविकास, नगरविकास, मदत पुनर्वसन, वने या खात्यांवरही त्यांची नजर असेल.
अमित ठाकरे यांची केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यावरच नजर ठेवणार नाहीत, तर हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्याही खात्यांवर करडी नजर ठेवतील.
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेचं हे शॅडो कॅबिनेट आहे. ठाकरे सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खातेनिहाय मनसे नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे मिळालेल्या संबंधित खात्यातील कारभार आणि त्रुटी शोधून सरकारला जाब विचारण्याचं काम असेल. दरम्यान “महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करु,” असं राज ठाकरे शॅडो कॅबिनेटची घोषणा झाल्यानंतर म्हणाले.

मनसेचं प्रतिरुप कॅबिनेट (Shadow Cabinet)
गृह, विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,
मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
वित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे
मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
सहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये
अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव
मत्स्यविकास : परशुराम उपरकर
महिला व बालविकास : शालिनी ठाकरे
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे
सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता
सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर
कौशल्य विकास : स्नेहल जाधव






