
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 14 मार्च या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. सध्या रुग्णाची प्रकृती स्थीर असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती.
आज एकूण 9 संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट्स आले. यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर इतर आठ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान दुबई आणि जपानचा प्रवास करून आले आहेत. तर 14 मार्चला यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याव्यतिरिक्त अन्य 11 संशयित रुग्णांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. यांच्यावर भोसरी येथील महापालिकेच्या नव्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली आहे.
गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 33 वर
- पुणे – 16
- मुंबई – 5
- ठाणे – 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई – 1
- पनवेल – 1
- नागपूर – 4
- अहमदनगर – 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद – 1
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
- महाराष्ट्र -33
- केरळ – 22
- पंजाब – 1
- दिल्ली – 7
- जम्मू कश्मीर – 2
- लडाख – 3
- राजस्थान – 4
- उत्तरप्रदेश – 11
- कर्नाटक – 6
- तामिळनाडू – 1
- तेलंगाना – 3
- हरयाणा – 14
- आंध्रप्रदेश – 1
दरम्यान पुणे महापालिकेने कोरोनोबाबत घरोघरी सर्वेक्षण करण्याचे योजिले असून त्याकरिता 125 पथकं तयार करण्यात आले आहेत.






