
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मागील 24 तासांमध्ये 368 जणांचा मृत्यूल झाला आहे. तसेच चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये फक्त 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जरी कोरोनाचा कहर कमी होत असेल तरी इटलीमध्ये मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. जगभरात आतापर्यंत 6515 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 एवढी कोरोनाबाधितांची संख्या आहे.
इटलीमध्ये गेल्या 14 तासांत जवळपास 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इटलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पार्कमध्ये जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतरही निर्बंध लावण्यात आले आहेत.
इटलीनंतर इराणमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथे मागील 24 तासांमद्ये 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये आणखी 1209 कोरोना बाधित आढळून आले असून जवळपास 14 हजार लोक कोरोनाने संक्रमित आहेत.
स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोनामुळे मत्यूतांडव सुरूच आहे. स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 96 तर फ्रान्समध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये 292 तर फ्रान्समध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 7800 हून अधिक कोरोना बाधित आहेत. तर फ्रान्समध्ये 5400 पेक्षा अधिक लोक कोरोना बाधित आहेत.
महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही कोरोनाने हैदोस घातला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेमध्ये एकूण 68 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 771 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये एकूण 3714 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, अमेरिकेने युरोपातील नागरिकांवर अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे.






