कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशात 137 तर राज्यात 41 वर, सरकार मार्फत गर्दी टाळण्याचे आवाहन; तूर्तास मुंबईतील रेल्वे बंद नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही – उद्धव ठाकरे

मुंबई: कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून देशात 137 झाली असून राज्यात 41 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना ग्रस्त रुग्ण हे पुण्यातून असून आतापर्यंत फक्त पुण्यात हा आकडा राज्यात सर्वाधिक म्हणजे 17 वर पोहचला आहे त्याखालोखाल मुंबईत 7 नवी मुंबईत 3 ठाणे, कल्याण, पनवेल प्रत्येकी एक असा आहे. दरम्यान सरकारने नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुट्टी देण्याच्या निर्णयाची चर्चा सुरु होती. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सोबतच मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आज कोरोनाच्या परिस्थितीची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यानंतर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यात 41 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एकाचा सकाळी मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये 26 पुरुष तर 14 महिला आहेत. यातील एक रुग्ण गंभीर आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

बस, ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण गर्दी टाळली नाही तर नाइलाजानं असा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं ते म्हणाले. ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आहे. बस, ट्रेन अत्यावश्यक सेवा आहेत. त्या बंद करु नयेत याच मताचे आम्ही आहोत, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारकडून येणाऱ्या कीटनुसारच रुग्णालयात चाचण्या होणार आहेत. कारण ते कीट्स योग्य प्रमाणीकरण करुन आपल्याकडे येत असतात. जे घरी राहायला तयार आहेत, त्यांच्या हातावर आपण क्वारंटाईनचा शिक्का मारत आहोत, असंही ते म्हणाले.