कोरोना व्हायरसचा देशात चौथा बळी

चंदीगढ : कोरोना व्हायरसमुळे देशात चौथा बळी गेला आहे. पंजाबच्या नवांशहरमध्ये जर्मनी आणि इटलीवरुन आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिस प्रशासनाने सदर व्यक्ती 70 वर्षीय असल्याची माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 173 लोकांना COVID 19 ची बाधा झाली आहे. यात 25 विदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत देशात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मृतक 65 वर्षाच्या वरील वयाचे होते. आतापर्यंत 20 लोकांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आता एकूण 149 रुग्णांवर देशभारात उपचार सुरु आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वृद्ध नागरिकांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष सवलती काढून घेतल्या आहेत. अनावश्यक प्रवास करण्यापासून परावृत्त करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. येत्या 20 मार्चपासून ही सवलत रद्द करण्यात आली होती. याशिवाय 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही बंद करण्यात येणार आहेत. पुढील एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आज मृत्यू झालेली पंजाबमधील 70 वर्षीय व्यक्ती इटलीमार्गे जर्मनीहून भारतात आली होती. छातीत दुखत असल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाचा कोरोना व्हायरसच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात या व्यक्तीचे निधन झाले. दरम्यान, या व्यक्तीच्या गावापासूनचा तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.