
मुंबई : भारतात अजून क्रिकेट वर्ल्ड कप फीवर चढला नाही कारण देशात निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच क्रिकेट बद्दल अजून कोणीही म्हणावे तसे चर्चा करताना दिसत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची नशा चढायला सुरुवात झाली आहे. संभाव्य विजेता संघ म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांची नावे घेतली जात आहेत. यंदाची विश्वकप स्पर्धा आतापर्यंतची सर्वात कठीण स्पर्धा असणार आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. या चार संघाव्यतिरिक न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे संघही धोकादायक ठरू शकतात. तसेच अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचीही ताकत वाढलेली दिसत आहे. परंतु जाणकारांच्या मते यंदाच्या विश्वकप स्पर्धेत संभाव्य विजेता संघ म्हणून इंग्लंडला प्रबळ दावेदार मानले जात आहे. इंग्लंडकडे भक्कम फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टी ठासून भरलेल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत सलग चार वेळा 350च्या पुढे धावा करून नवा विक्रम केला आणि पाकिस्तानला क्लीन स्वीप दिला. सट्टा बाजार, क्रीडा तज्ञ आणि आजी-माजी क्रिकेटपटू यासर्वानीच इंग्लंडच्या संघाला नंबर एकाचा पसंती क्रमांक दिला आहे.











