राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा 5 वर,मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला

मुंबई: राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे. राज्यात आज कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाशीतील एका खासगी रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यूू झाला आहे.

गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक 65 वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांतून होऊन वाशी येथील खासगी हॉस्पिटल येथे दाखल झाली होती. या महिलेची स्थिती अत्यंत गंभीर होती. उपचारादरम्यान तिचा 24 मार्च रोजी रात्री मृत्यू झाला. मृत महिला करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन स्पष्ट झालं आहे. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.

आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 125 झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 269 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3243 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2750 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 125 जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई – 49
  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 18
  • सांगली – 9
  • नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली – 6
  • नागपूर – 5
  • यवतमाळ – 4
  • अहमदनगर – 3
  • ठाणे – 3
  • सातारा – 2
  • पनवेल – 2
  • उल्हासनगर – 1
  • औरंगाबाद -1
  • रत्नागिरी – 1
  • वसई-विरार – 1
  • पुणे ग्रामीण – 1
  • सिंधुदुर्ग – 1
  • मृत्यू – 4