
सावंतवाडी: जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असताना भारतातही प्रवेश केला आणि सगळ्यांची झोप उडवली. महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या देशात सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केला. यामुळे सर्व व्यवहार पूर्ण ठप्प झाले आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या लॉक डाऊन चा परिणाम जाणवू लागला आहे. अनेक कार्यालये, दुकाने आणि शाळा कॉलेज बंद करण्यात आले आहेत. कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यात लॉक डाऊन मुळे दुकाने बंद आहेत.
जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी भुसारी दुकाने तात्काळ सुरू करा अशा सूचना मुख्य कार्यकारी सिंधुदुर्ग यांनी आज दिल्या आहेत.त्यामुळे आज पासून तीन दिवस बंद राहणार असलेली दुकाने तात्काळ दुपारपासून सुरू होणार आहे. मात्र नागरिकांनी गर्दी करू नये आवश्यक डिस्टन्स पाळावे असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे. ते म्हणाले, शहरात जंतुनाशक फवारणी करण्यासाठी आज सकाळपासून तीन दिवस दुकाने बंद करण्याचा निर्णय सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व व्यापाऱ्यांनी घेतला होता, परंतु जीवनावश्यक वस्तू ची आवश्यक गरज लक्षात घेता तात्काळ दुकाने सुरू करण्यात यावेत अशा सूचनावजा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आज दुपारपासून पुन्हा दुकाने सुरू होणार आहेत.






