
मुंबई:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे 9 मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका उदभवू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता, जनतेने लाईट बंद न करता दिवे लावावेत असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या वेळी सायंकाळी पाच वाजता थाळी, टाळी वाजवण्यास सांगितले होते.
जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.






