
मुंबई : सर्व नागरिकांनी देशात लावलेला लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. तर लॉकडाऊनची शिस्त पाळली नाही तर अर्थिकसंकट निर्माण होईल, अशी भितीही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊन यावर भाष्य केलं आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून एवढी शांतता 1992-93 च्या दंगलीदरम्यानही पाहिली नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं आहे. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. ‘दिवे लावून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून परिणाम होणार असेल तर होऊ दे, पण नुसतं दिवे लावण्याचं आवाहन करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात आशेचा किरण दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. उद्या जर उद्योगधंदे बंद झाले, तर त्याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होणार आहे. यावर पंतप्रधानांनी बोलणं अपेक्षीत होतं.






