महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महानिकाल; सस्पेन्स कायम महायुती की शिवसेनेची वेगळी रणनिती?

मुंबई: महाराष्ट्राची जनता जनार्दन किती सुज्ञ आहे हे कालच्या निवडणूक निकालानंतर सर्व राजकीय पक्षांच्यालक्षात आले असेल. शेवटचा निकाल हाती आल्यानंतर महायुतीला 163 तर महाआघाडीला 106 व इतर 19 असं चित्र आहे. दरम्यान शिवसेनेने भाजपाला फिफ्टी फिफ्टी सूत्राची आठवण करून दिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या आहेत आणि एका अर्थाने या पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. शिवसेनेने आधी फॉर्म्युला मग सरकार असे सांगून भाजपाला कोंडीत पकडले आहे. यामुळे पुढील पाच वर्षे शिवसेनेची रणनिती कशी असणार आहे हे स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत जवळपास आठ विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत ज्यामध्ये पंकजा मुंडे, राम शिंदे, अर्जुन खोतकर, इत्यादी मंत्र्याचा समावेश आहे. आयाराम गयाराम पैकी निम्मे नेते पराभूत झाले आहेत. एकुण महाराष्ट्रात तरी शिवसेना आक्रमक झाली असून कदाचित भाजपाकडून सन्मानजनक सत्तेत वाटा न मिळाल्यास काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वेगळं समीकरण जुळून येवू शकते. सध्या तरी उध्दव ठाकरे आक्रमक असून देवेंद्र फडणवीस कसे शिवसेनेला हाताळतात त्यावरच महायुतीच पुढचं सरकार अवलंबून असेल.