डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर गय केली जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला व कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नवीन विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचं आजच्या संवादातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सरकार करीत असलेल्या उपाय योजना बरोबर लॉक डाऊन काळात बेशिस्त पणे वागणाऱना कडक शब्दात समजही दिली आहे.

आपली जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस मात्र एकच आहे. आपण कोरोनासोबत लढा देत आहोत. या लढाईत डॉक्टर, नर्सेससोबत काही विकृती गैरवर्तन करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा विकृतींची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाच्या या लढाईत काही विकृती समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये असाध्य रोगी, वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळं आता वृद्धांची अधिक काळजी घेणार असल्याचे ते म्हणाले. 

सर्व धर्मियांनी आपले सण, उत्सव घरातच साजरे करा, असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री म्हणाले की,  तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही. दिल्लीवरुन मरकजमधून आलेले 100 टक्के लोक सापडले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यात अडकलेल्या परप्रांतियांची आम्ही सोय केली आहे, त्यांनी घाबरुन जाऊ नये, असंही ठाकरे म्हणाले. तसेच परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूर, कामगारांनी काळजी घ्या, जिथं असाल तिथं थांबा, तुमची सोय केली जाईल, असंही ते म्हणाले.