
मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये, यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात खोटे, आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरची कारवाई प्रभावीपणे सुरू आहे. या प्रकरणी आजपर्यंत १३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. टिकटॉक, फेसबुक , ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर (social media) चालणाऱ्या गैरप्रकारांवर महाराष्ट्र सायबर बारीक लक्ष ठेवून आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरने दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे.
आजपर्यंत राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये १३२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये बीड १६, कोल्हापूर १३, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, जालना ८, सातारा ७, जळगाव ७, नाशिक ग्रामीण ६, नागपूर शहर ४, नाशिक शहर ५, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३, रत्नागिरी ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, उस्मानाबाद १, हिंगोली १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केल्यावर असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत ३५ आरोपींना अटक केली आहे.
राज्यात काल कोल्हापूर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद आदी विविध ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक /व्हाट्सअप व अन्य सोशल मीडियाचा (social media ) वापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे त्यापरिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन
महाराष्ट्र सायबर असे देखील नमूद करू इच्छिते की सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्याही वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेतस्थळाशी (website) तुम्हाला जोडले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो. मोबाईल नंबर दिल्यानंतर एक कॉल येतो व त्या संकेत स्थळावरील एक फॉर्म भरायला सांगितले जाते. ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स, क्रेडिट/ डेबिट कार्डची सर्व माहिती विचारली जाते. त्यानंतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा ‘ओटीपी’ कन्फर्म करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो. काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो.सर्व नागरिकांनी अशी ऑनलाईन खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा कळवावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केली आहे.
कोरोना विषाणुसंदर्भात अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना सूचित करते की, कोरोना विषाणू संदर्भात अफवा पसरविणे , खोटी/चुकीची माहिती सोशल मीडिया वर प्रसारित करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल व त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त राहावे, असेही महाराष्ट्र सायबरच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की, कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉटसअप किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत अथवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.






