
कोल्हापूर : जिल्ह्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणक्षेत्रात पाऊस सुरुच आहे. अद्यापही राधानगरी धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८ बंधारे अजूनही पाण्याखाली असून १ एक राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर तिकडे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून २१६७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण ८ बंधारे पाण्याखाली आहेत. कोयना धरणात ३४.३७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ५४. ८३८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४३.३६ दलघमी, वारणा ३८७.४२ दलघमी, दूधगंगा २६८.३२ दलघमी, कासारी ३१.०५ दलघमी, कडवी २९.६९ दलघमी, कुंभी ३१.७१ दलघमी, पाटगाव ३४.८८ दलघमी, चिकोत्रा १६.५३ दलघमी, चित्री १४.१२ दलघमी, जंगमहट्टी ८.३७ दलघमी, घटप्रभा ४२.७३ दलघमी, जांबरे १०.११ दलघमी, कोदे (ल पा) ४.६८ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १६.६ फूट, सुर्वे १८ फूट, रुई ४५.६ फूट, इचलकरंजी ४३ फूट, तेरवाड ४१ फूट, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २८ फूट, राजापूर १७.९ फूट तर नजीकच्या सांगली ७.६ फूट व अंकली ९.२ फूट अशी आहे.
?जिल्ह्यातील १ वाहतूक मार्ग बंद
पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता, कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर – १९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर १ फूट पाणी असल्याने वाहतूक बंद असून पर्यायी वाहतूक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे.
?जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात काल (दि. २१ जून) दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात २३.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज (दि. २२ जून) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. पन्हाळा- ३.५७ मिमी, शाहुवाडी- ८.५० मिमी, गगनबावडा- २३.५० मिमी, कागल- १.१४, भुदरगड- ०.४० मिमी, आजरा- ९.५० मिमी, चंदगड- २.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.






