Review: पी एम नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालेय जीवनापासून त्यांनी २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेईपर्यंतचा कालखंड यात आहे. शाळेत जाण्याआधी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा, इतरांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या आपल्या आईला घरी भांडी धुवू न देणारा, चहा विकता विकता मोठ्यांची ‘नेहरूऐवजी सरदार पटेल पंतप्रधान असते तर चीनकडून पराभव झाला नसता’ आदी ‘चाय पे चर्चा’ ऐकणारा, पुढे मोठा झाल्यावर सैनिक बनून देशासाठी काम करू इछिणारा, देशसेवेची सतत संधी शोधणारा आणि पुढे संघ परिवारात आल्यानंतर निरंतर यश मिळवत, आपल्या बुद्धीचातुर्याने सर्व संकट व परिस्थितीवर मात करणारा, अशा नरेंद्र मोदींचा आलेख त्यात आहे. 

नायकाचा आलेख उंचावण्यासाठी इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना खूपच क्षुल्लक बनवले आहे. ते म्हणजे देश विकतच बसले होते आणि मोदी यांनी सत्तेवर येण्याची त्यासाठी गरज होती, असा सगळा सूर आहे. आणि मनमोहन सिंह यांना तर ज्याला थोडे फार जगाचे (खरे) ज्ञान आहे त्यालाही चीड येईल इतके विदूषकी दाखवले आहे. नरेंद्र मोदी हे चरित्रनायक असल्याने त्यांचे गेल्या काही वर्षातील समाजमध्यमातून परिचित रूप विशाल स्वरूपात दाखवले आहे. त्यासाठी बिकावू पत्रकारापासून पाकिस्तानातील लष्कर आणि दहशतवाद्यांपर्यंत बालिश चित्रण करण्यात आले आहे. वाजपेयी, आडवाणी यांचेही चित्रण वरवरचे आणि दुर्लक्षित आहे.