अबब! कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तीचा तीन दिवस प्रवास

नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा आज शपथविधी

मुंबई – टाळेबंदीमुळे हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने आजच्या शपथविधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना कोलकाता ते मुंबई असा तीन दिवस प्रवास करून मुंबई गाठावी लागली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सोमवारी निवृत्त झाल्याने कोलकाता उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती दत्ता यांची गुरुवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

टाळेबंदीमुळे मुख्य न्यायमूर्ती पद बराच वेळ रिक्त राहू नये, म्हणून ते तातडीने स्वीकारण्याचे त्यांनी ठरवले.

मात्र टाळेबंदी असल्याने शपथविधीला पोहोचायचे कसे, असा प्रश्न होता.

त्यावर तोडगा म्हणून न्यायमूर्ती दत्ता यांनी कोलकाता ते मुंबई हा प्रवास रस्तेमार्गे करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी शनिवारी सकाळी मुलासोबत कोलकाता ते मुंबई प्रवास सुरू केला व आज मुंबईत दाखल झाले.