नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगारांना आपत्ती व्यस्थापन कायद्यानुसार सेवाचा मोबदला द्या

मनसे मनपा कामगार सेनेची मागणी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या १७ विभागांपैकी बहुसंख्य कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे सभासद असून जगभरात चालू असलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे भारतात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये कायम स्वरूपी कामगार व कंत्राटी कामगार असा कुठेही उल्लेख नाही अत्यावशक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी समान आहेत जरी दैनंदिन कामकाज हे अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्याप्रमाणे चालत असते तरी आपत्ती व्यस्थापन हा स्वतंत्र कायदा आहे. या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व विभागातील कामगारांना अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून व आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष नियोजन म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून रोज काम करावे लागत आहे.

मनसे युनियनचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सदर आपत्ती व्यवस्थापन नियोजानादरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे कामगार हितासाठी काही सूचक निर्णय घ्यावेत अशी मागणी पत्राद्वारे आज नवी मुंबई आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांना केली.

१) केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेत काम करत असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबासाठी ५० लाखाचे विमा संरक्षण कायम स्वरूपी कामगारांना लागू केले आहे व संघटनेच्या यापूर्वी केलेल्या मागणीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने विमा संरक्षणाची तरतूद कंत्राटी कामगारांसाठी करावी.

२) ६५०० कंत्राटी कामगारांना त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याने इच्छा असूनही कामगार सेवेमध्ये रुजू होऊ शकत नाहीत तरी राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे कामगारांचे वेतन कपात न करता पूर्ण पगार देण्यात यावा.

३) आपण काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे प्रतिदिन ३०० रुपये प्रमाणे लागू केलेला विशेष भत्ता एप्रिल महिन्याच्या पगारासोबत देण्यात यावा.

४) लॉकडाऊन दरम्यान जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना सुरक्षा उपकरणांची कमतरता भासत आहे त्याची पूर्तता करण्यात यावी

५) कोरोना (कोविड १९) अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांनी दिलेल्या तक्रारीनुसार नवी मुंबई महापलिका रुग्ण्यालायातील कामगारांना सकस आहार मिळत नाही तरी त्याची व्यवस्था करण्यात यावी.

६) घनकचरा विभागातील कामगारांचे किमान वेतन थकबाकीचे उर्वरित २ हफ्ते त्वरित खात्यात जमा करण्यात यावेत.