
मुंबईः जगाचा कारभार ठप्प करणारा कोरोना आजार दातांच्या मुळावर उठलाय. कोरोनाची तीव्रता वाढू लागल्यापासून दातांचे दवाखाने बंद झाले आहेत. सध्या देशभर दातांवरचे उपचार बंद आहेत.
कोरोना हा संसर्गजन्य आजार प्रामुख्याने शिंकणे, खोकणे यामुळे पसरतो. नाकातोंडावाटे शरीरातील कोविड१९ विषाणू काही प्रमाणात बाहेर फेकला जातो. अशा वेळी आसपास असणाऱ्यांच्या शरीरात या विषाणूचा प्रवेश होण्याची सर्वाधिक शक्यता असते.
दातांवर उपचार करताना डेंटिस्ट मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरतात. पण कोविड१९ विषाणू दातांवर उपचार करण्याच्या उपकरणावर राहू शकतात. कितीही काळजी घेतली तरी इतर विषाणूंपेक्षा जास्त वेळ टिकून राहण्याची क्षमता असल्यामुळे कोविड१९ विषाणू डॉक्टर आणि त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्व दातांचे दवाखाने बंद आहेत.
दातांच्या किरकोळ आजारासाठी सध्या डेंटिस्ट फोनवर बोलून, व्हिडीओ कॉलवर अथवा ई-मेलद्वारे कोणते औषध किती वेळा आणि किती प्रमाणात घ्यावे याचा सल्ला देत आहेत. एखाद्या व्यक्तीला दातांचा असह्य त्रास झाला तर अपवाद म्हणून डेंटिस्ट त्या रुग्णावर उपचार करत आहेत. एरवी दातांवरचे उपचार बंद ठेवण्यात आले आहे.
पीपीई किट वापरुन उपचार करणे भारतीय डॉक्टरांना सध्या परवडणारे नाही. कारण प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र पीपीई किट वापरणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. तसेच प्रत्येक रुग्णासाठी वेगळे किट वापरले नाही तर तो रुग्ण कोरोनाबाधीत होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोरोना संकट टळेपर्यंत दातांचे दवाखाने उघडले जाण्याची शक्यता नाही. अनेक डेंटिस्टना (दातांचे डॉक्टर) प्रॅक्टिस न करणे परवडणारे नाही. दवाखान्याच्या जागेचे भाडे, उपकरणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते अशी मोठी रक्कम त्यांनाही नियमित भरावी लागते. प्रॅक्टिस बंद असल्यामुळे डेंटिस्टची ओढाताण होण्याची शक्यता आहे. पण कोरोना टाळायचा तर ही काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही, हे सर्व डेंटिस्ट मान्य करत आहेत.











