राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी १० हजार एसटी बसेस सोडणार – विजय वडेट्टीवार

मुंबई-राज्यातील विविध भागात लॉकडाउनमुळं अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यातल्या गावी पोहोचवण्यासाठी १० हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत

विशेष म्हणजे अशा लोकांसाठी हा एसटीचा प्रवास मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली.

पुढच्या दोन-तीन दिवसांत या माध्यमातून जवळपास १० हजार बसेस सोडून या अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, स्क्रिनिंगचं काम, गरज पडल्यास करोनाची लक्षणं आढळून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणं, या बाबींची चर्चाही झाली आहे. त्यानंतर पुढच्या चार-पाच दिवसांत मुंबई, पुणे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी, नातेवाईकांकडे गेलेले लोक, मजूर या सर्वांना त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच या लोकांना तिकीटाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भुमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला केल्या आहेत,अशी माहितीही वडेट्टिवार यांनी दिली.