दिल्लीत अडकलेले विद्यार्थी स्वगृही परतले,कल्याण स्थानकात स्वागत

ठाण्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण – दिल्लीत ‘युपीएससी’ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तिथे अडकून पडले होते. हे सर्व विद्यार्थी काल महाराष्ट्रात परतले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सोडलेल्या विशेष ट्रेनद्वारे हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात परतले.

कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमूळे यूपीएससीची तयारी करणारे हे सर्व विद्यार्थी दिल्लीमध्ये अडकून पडले होते. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकडे घातले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही राज्य सरकार तसंच केंद्र स्तरावर पाठपुरावा केला.

कल्याण रेल्वे स्थानकात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ८८ विद्यार्थी उतरले. या सर्वांना आपापल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातून खासगी, टॅक्सी आणि एसटी बसेसचीही सोय करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या सर्वांच्या हातावर होम कॉरंटाईनचे शिक्के मारण्यात आले.