जळगावात निलेश राणे यांच्यावर तृतीयपंथीयांकडून गुन्हा दाखल

जळगाव – ट्विटरवरून सतत शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे समाचार घेणारे भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे हे चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. एक राजकीय ट्विट करताना हिजडा असा शब्दप्रयोग केल्याने ते अडचणीत आले आहेत. तृतीयपंथी समाजाने जळगावात येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणी निलेश राणे यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता’,असं निलेश राणे म्हणाले आहेत.