Review: भारत – फक्त ‘सलमान’

सलमानचे काही सिनेमे खरंच पूर्ण मसालेदार असूनही पुरेपूर रंजन करणारे होते. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो वॉण्टेड, दबंग, सुलतान, बजरंगी भाईजान आदी सिनेमांचा. कारण हे सिनेमे दे मार होतेच. पण त्यात त्याला एक गोष्ट होती. ती फार रंजक होती. अली अब्बास जफर हा काही पहिल्यांदा सलमानला दिग्दर्शित करतोय असं नाही. त्यामुळे अपेक्षा वाढतात. मघाशी सांगितल्याप्रमाणे सलमानचं दिसणं इथे दिग्दर्शकाने पुरेपूर कॅश केलं आहे. पण जेव्हा कथा आणि पटकथेचा भाग येतो त्यावेळी या सिनेमाची गोष्ट अगदीच पोकळ आहे. 

सिनेमाा 2010 मध्ये सुरु होतो. आज भारत आहे 70 वर्षाचा. तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. तो करता करता सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. भारत-पाकिस्तानच्या फाळणीभवती भारतची गोष्ट फिरते. फाळणीवेळी भारत आणि त्याचं कुटुंब भारतात वडिलांच्या बहिणीकडे येतं. त्या गर्दीत भारतची छोटी बहीण गुडिया प्लॅटफॉर्मवर राहते. तिला घ्यायला तिचे वडील उतरतात. तो दोघे पाकिस्तानात आणि भारत, त्याची आई आणि दोन भावंडं भारतात असा प्रकार होतो. घरची जबाबदारी भारतवर येते. डेअरिंगबाज भारत एकेक जॉब स्वीकारत पुढे जातो. मग त्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसं भेटतात. मैत्रीणी भेटतात. त्यातून त्याला कुमुद मॅडम सर भेटते. मग गोष्ट पुढे जाऊन फ्लॅशबॅक पूर्ण होतो.

या सिनेमात अनेक इमोशनल प्रसंग घालण्यात आले आहेत. म्हणून सिनेमा होल्ड होतो. विशेष उल्लेख करायला हवा तो शेवटी येणाऱ्या फाळणीशी संबंधित टीव्हीशोचा. तो फक्कड जमला आहे. त्यावेळी मात्र डोळे पाणावतात. गाण्यांमध्ये ‘स्लोमोशन में..’, ‘चाशनी..’ ही गाणी चांगली जमली आहेत. त्यात सलमानने धमाकाही खूप केला आहे