भाजपशासित राज्यात कोरोना रुग्णसंख्या दडवली जाते ; सचिन सावंत यांचा भाजपवर आरोप

मुंबई – भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे अंधारकोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली आहे.

गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशमध्ये तीच परिस्थिती आहे. भाजपशासित राज्यात तेथील सरकारांनी कोरोनासमोर लोटांगण घातले असून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गुजरात मॉडेलच्या चंद्राला पडलेली विवरे आधी पहावीत आणि नंतर महाराष्ट्र सरकारबद्दल बोलावे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांना दिला आहे.

‘एकट्या अहमदाबादमध्ये ७० टक्के कोरोना रुग्ण आढळतील असे म्हटले आहे. याचा अर्थ अहमदाबादची सध्याची संयुक्त महासंघाच्या अंदाजानुसार ७८ लाख लोकसंख्या गृहित धऱता किंवा २०११ च्या जनगणनेच्या आधारावर अहमदाबादची लोकसंख्या ५५.७ लक्ष आहे हे पाहता ७० टक्के रुग्ण म्हणजे कमाल ५५ लाख तर किमान ४० लाख कोरोना रुग्ण आहेत असे म्हणावे लागेल आणि निश्चितच हे आकडे दडवले जात आहेत’ असंही ते म्हणाले.