कोरोना बरोबर संकट महाराष्ट्रावर निसर्ग संकट

महाराष्ट्राची जनता एकीकडे कोरोनाविरोधात लढत असताना,आता निसर्गाचीही आपल्यावर अवकृपा होऊ लागली आहे.ज्या निसर्गाची आपण पूजा करतो,त्याच नावाचे वादळ आता आपल्यावर घोंगावू लागले आहे.

राज्यातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड व पालघर जिल्ह्याला या निसर्ग वादळाचा फटका बसेल,असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.त्यामुळे राज्य सरकारने या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी आपात्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे.आज दुपारी तीनच्या सुमारास,हे वादळ कोकण किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.

अशा या दुहेरी संकटामुळे राज्यातील जनता व सरकारही हबकून गेले आहे.ताशी १०० ते ११० मैल वेगाने वारे वाहतील,तसेच जोरदार वृष्टी होऊन समुद्रकिनारी असलेल्या गावांत मोठ्याप्रमाणात नुकसान होईल,म्हणून केंद्र सरकारने एनडीआरएफची नऊ पथके राज्यात पाठवली आहेत.ही सर्व पथके कोकणातील सर्व समुद्रकिनारी पोहोचली असून त्यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.

समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे,तर मच्छीमाराना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.या वादळाचा मुंबईपासून सुमारे सव्वासहाशे किमी.अंतरापर्यंत प्रभाव राहील,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.रायगड मध्ये ६२ तर पालघर जिल्ह्यात २२ गावांना या वादळाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.