
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
एमपीएससीच्या निकालानंतर उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून १० दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.






