
सिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथच्या शतकाच्या बळावर 389 रन्सचा डोंगर उभारला. टीम इंडियाने प्रत्युतर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना 338 रन्सपर्यंतच मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्या वनडेप्रमाणेच भारतीय बॉलर्सचा खरपूस समाचार घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच जोडीने 142 रन्सची खणखणीत सलामी दिली. फिंच 60 रन्स करून बाद झाला. शतकाकडे कूच करणारा वॉर्नर श्रेयस अय्यरच्या थ्रोची शिकार ठरला. त्याने 83 रन्सची खेळी केली.
स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 136 रन्सची भागीदारी केली. कुठलेही अनोखे फटके न खेळताही आक्रमक खेळता येतं याचा वस्तुपाठ सादर करताना स्मिथने शतकी खेळी साकारली.
स्मिथने कारकीर्दीतल्या शतकाची नोंद केली. त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांसह 64 बॉलमध्येच 104 रन्सची खेळी केली.
स्मिथ बाद झाल्यावर लबूशेनला ग्लेन मॅक्सवेलची साथ मिळाली. स्फोटक बॅटिंगसाठी प्रसिद्ध मॅक्सवेलने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4षटकारांसह नाबाद 63 रन्सची वेगवान खेळी केली. लबूशेनने नाबाद 70 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियाने 389 रन्सचा डोंगर उभारत टीम इंडियाला डोंगराएवढं लक्ष्य दिलं.
टीम इंडियासाठी शिखर धवन आणि मयांक अगरवाल यांनी 58 रन्सची सलामी दिली. मात्र यानंतर दोघेही झटपट बाद झाले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 रन्सची भागीदारी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने राहुलला हाताशी घेत चौथ्या विकेटसाठी 72 रन्स जोडल्या.
जोश हेझलवूडने कोहलीला बाद करत भागीदारी फोडली. राहुल आणि हार्दिक पंड्या जोडीने पाचव्या विकेटसाठी 63 रन्स जोडत अशक्य विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र राहुल आणि हार्दिक बाद होताच ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला.
कोहलीने 89 तर राहुलने 76 रन्सची खेळी केली. पॅट कमिन्सने 3 तर हेझलवूड आणि झंपा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
तडाखेबंद बॅटिंगच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडेत भारताला नमवत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी या भारतीय माणसाने भल्यामोठ्या स्टेडियममध्ये प्रेमिकेला प्रपोज करत तिचं मन जिंकलं आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या मॅचमध्ये कोरोना कारणास्तव मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जदरम्यान, 20व्या ओव्हरवेळी एका भारतीय माणसाने आपल्या ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला स्टेडियमध्ये प्रपोज केलं.












