
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. भारताच्या लोकशाहीला आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतातील मतदारांना तुम्ही कोणत्याही मापदंडात मोजू शकत नाही. सत्तेच्या मानसिकतेचा मतदार स्वीकार करत नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यापूर्वी मोदींनी संविधानाला नमन केले. भाषणातही मोदींनी याचा उल्लेख केला. मी संविधानाला नमन केले. लोकप्रतिनिधींमध्ये कधीही भेदभाव करता येणार नाही. जे आपल्यासोबत आहेत किंवा भविष्यात आपल्यासोबत येतील, आपण त्यांच्यासाठी काम करतोय, असे त्यांनी नमूद केले. हा देश मेहनतीची पूजा करतो. देश प्रामाणिकपणाचा आदर करतो आणि हीच या देशाची पवित्रता आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.






