बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’souza) याला हृदयविकाराचा झटका

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’souza) याला आज (11 डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमो याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरु झाले. या बातमीनंतर रेमो डिसूजाचे चाहते चिंतेत आहेत. मात्र त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

रेमो याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर बॉलिवूड कोरियोग्राफर धर्मेश (Dharmesh), कृति महेश (Kruti Mahesh) आणि अभिनेता आमिर अली (Aamir Ali) प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाले होते. 

धर्मेश यांनी सांगतिले की, “रेमो ची प्रकृती आता स्थिर आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार रेमो याच्या हृदयातील ब्लॉकेजेस काढण्यासाठी त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर निगराणीसाठी त्याला आयसीयूत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर धर्मेश यांनी रेमो डिसूजा ठीक असून चिंतेचे काही कारण नसल्याची माहिती मीडियाला दिली आहे.