मुंबईत पावसाचा जोर सोमवारपर्यंत कमी होणार

मुंबईत शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असतानाच सोमवारपर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत कालपासून चांगला पाऊस झाला. गेल्या २४ तासांत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सरासरी २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने २३४ मिमी पावसाची नोंद केली. मात्र, पावसाचा हा जोर आता हळूहळू कमी होणार आहे. ही स्थिती लक्षात घेता पुढच्या २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाचा जो अॅलर्ट जारी करण्यात आला होता, त्यात बदल करण्यात येत आहे. आज सायंकाळपासूनच पावसाचे प्रमाण कमी कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केला.