
देशातील पहिला सीएनजी ट्रॅक्टर (CNG Tractor) लॉन्च करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातील पहिला सीएनजीमध्ये रूपांतरित डिझेल ट्रॅक्टर सादर केला.
या ट्रॅक्टरमुळे वर्षामध्ये सुमारे एक ते दोन लाख रुपयांची बचत होईल, असा दावा केला जात आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि डिझेलपेक्षा खर्च कमी होईल असेही सांगितले जात आहे. हा ट्रॅक्टर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशिवाय धर्मेंद्र प्रधान, जनरल व्ही. के. सिंह आणि पुरुषोत्तम रुपाला उपस्थित होते.
हा ट्रॅक्टर रोमॅट टेक्नो सोल्यूशन आणि टोमॅसेटो एकाइल इंडियाने संयुक्तपणे विकसित केला आहे. कंपनीच्या मते, यामुळे शेतकर्यांचा खर्च कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ग्रामीण भारतात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासही मदत होईल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की सीएनजी, इंधनावरील खर्चात लक्षणीय घट करेल तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.






