आगामी २४ तासांत मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज. मुंबईची झाली तुंबापुरी.

मुंबई : पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मुंबईची उपनगरीय रेल्वेसेवेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू.

गेल्या तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने आज मुंबईची दाणादाण उडवली. मध्यरात्रीपासूनच धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबले.

तसेच पावसामुळे लोकल सेवेलाही फटका बसल्याने रेल्वे प्रशासनाचे दावेही फोल ठरले आहेत.
पावसाळ्यापूर्वीचे नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून केला जात होता. तसेच मुंबईत पाणी तुंबणार नसल्याचंही बोललं जात होतं. रस्त्याची कामंही पूर्ण झाल्याने रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य होणार नसल्याचंही सांगण्यात येत होतं. इतकंच नव्हे तर पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू असल्याचं दाखवण्यासाठी पालिकेने आरजे मलिष्का आणि अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन वरळी येथील महापालिकेच्या लव्हा‍ग्रोव्ह पंपिंग स्टेशनला भेट दिली होती. तसेच या दोघांनाही महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची ओळख करून देण्यात आली होती. मात्र पावसामुळे पालिकेचे सर्व दावे फोल ठरले आहेत. मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे माटुंगा आणि शीव पोलीस ठाणे परिसरात पाणी तुंबल्याने पोलीस स्टेशनही पाण्यात गेले आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील भक्ती पार्क परिसरातही मुसळधार पावसामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. सायन येथे एसआयईएस महाविद्यालयाजवळील गुरुकृपा येथीही पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला होता. सायनच्या गांधी मार्केटमध्येही हीच परिस्थिती होती. कुर्ला, सांताक्रुझ परिसरातही पाणी तुंबल्याने कुर्ला डेपो ते बीकेसी पर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. दादर हिंदमाता आणि किंग्ज सर्कल उड्डाणपुलावरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.