
राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 55 धावांनी धुक्वा उडवत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला तिसरा विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर पहिला सामना खेळणाऱया सनरायझर्स हैदराबादला मात्र सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. केन विल्यमसनच्या नेतृत्वातही संघाच्या निकालात फरक पडला नाही.
राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या 221 धावांचा पाठलाग करणाऱया सनरायझर्स हैदराबादला 8 बाद 165 धावांपर्यंत मजल मारता आली. मनीष पांडे (31 धावा), जॉनी बेअरस्टो (30 धावा) व कर्णधार केन विल्यमसन (20 धावा) या पहिल्या तीन प्रमुख फलंदाजांना सुरुवात चांगली करता आली, पण मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देता आला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याने 20 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अनुभवी गोलंदाज ख्रिस मॉरीसने 29 धावा देत तीन फलंदाज बाद केले.
सनरायझर्स हैदराबादने रविवारच्या लढतीत परदेशी खेळाडूंमध्ये एक बदल केला. डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला अंतिम अकरामध्येही संधी देण्यात आली नाही. त्याच्याऐवजी गोलंदाज मोहम्मद नबीला संधी देण्यात आली.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नव्या कर्णधाराने राशीद खान या अफगाण गोलंदाजाला सुरुवातीलाच आणले. त्याने तिसऱयाच षटकात यशस्वी जैसवालला 12 धावांवर पायचीत केले आणि राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दिला; पण यानंतर जोस बटलर व संजू सॅमसन या जोडीने दुसऱया विकेटसाठी 150 धावांची खणखणीत भागीदारी रचली. दोघांच्या झंझावाती फलंदाजीत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. विजय शंकरने संजू सॅमसनला 48 धावांवर बाद केले आणि जोडी तोडली. संजू सॅमसनने आपल्या खेळीत दोन षटकार व चार चौकार चोपून काढले.










