
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आणि शेवटपर्यंत अत्यंत चुरशीने झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी निसटता विजय झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. या मतदारसंघात प्रथमच भाजपने विजय मिळविला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत 19 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी आवताडे विजयी झाल्याचे घोषित केले. विजयानंतर आवताडे व परिचारक समर्थकांनी जल्लोष केला.
सकाळी आठ वाजता शसकीय गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली.पहिल्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी 350 मतांची आघाडी घेतली होती. मात्र, नंतर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी काही फेऱयांमध्ये मताधिक्क्य मिळविले होते. पंढरपूर शहरातील मतमोजणीत पुन्हा आवताडेंनी आघाडी घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी काम पाहिले. पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम व शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला. मी या निमित्त आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे अभिनंदन करतो आहे. आमच्या सर्व खासदार, आमदार व नेत्यांनी तिथे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष घातलं व प्रचार केला. पंढरपूरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे, हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमधील विजयासंदर्भात दिली.






