श्रीलंकेचा मालिका विजय

श्रीलंकेने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा 209 धावांनी धुव्वा उडवून दोन सामन्यांची मालिका 1-0 फरकाने जिंकली. कर्णधार दिमुथ करुणारत्नेची दोन्ही डावांतील झुंजार फलंदाजी… लाहिरु थिरुमानेची पहिल्या डावातील 140 धावांची मॅरेथॉन खेळी आणि डावखुरा फिरकीपटू प्रवीण जयविक्रमने दोन्ही डावांत (11 बळी) केलेली अफलातून गोलंदाजी ही श्रीलंकेच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. पदार्पणवीर प्रवीण जयविक्रम या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळ दिमुथ करुणारत्नेच्या गळय़ात पडली.

श्रीलंकेने 7 बाद 493 धावसंख्येवर डाव घोषित केल्यानंतर बांगलादेशला 251 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 242 धावांची मोठी आघाडी घेत अर्धी लढाई आधीच जिंकली होती. त्यानंतर श्रीलंकेने 9 बाद 194 धावांवर आपला दुसरा डाव घोषित करून बांगलादेशला विजयासाठी 437 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 71 षटकांत 227 धावांवरच संपुष्टात आला आणि श्रीलंकेने रुबाबदार विजयासह मालिकाही खिशात टाकली.