
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढत असताना शनिवारी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक असणार नाही.
रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची चाचणी केली जात होती आणि या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले जात होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केलेआहेत. याबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली असून त्यानुसार कोरोना रुग्णालयात किंवा कोविड सेंडरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाला आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे बंधनकारक नसणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘कोरोनाच्या संशयित रुग्णांना सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये ठेवता येऊ शकते. तसेच कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास किंवा त्याला औषधे, ऑक्सिजन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यास नकार देता येणार नाही. रुग्ण दुसऱ्या शहरातील असला तरीही त्याला सेवा द्यावीच लागेल. एखाद्या रुग्णाकडे आधार कार्ड किंवा ओळखपत्र नसेल तर रुग्णालय त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नाकारू शकत नाही.’











